Wednesday 25 January 2012

।। श्री श्री गुरुवे नम: ।।
।। प.प.श्री. लोकनाथतीर्थ स्वामी महाराज की जय ।।
।। प.पु.सद्गुरुनाथ श्री. काका महाराज की जय ।।

सिद्धयोग (महायोग) पूर्वाभ्यास पद्धती

सध्याच्या अंदाधुंद विनाशकारी युगात मनुष्य शांती हरवून बसला आहे. आजपर्यंत अनेक संत-सत्पुरुषांनी ‘‘शांती हवी तर अशांत करणाऱ्या गोष्टींचा त्याग करा’’ असा उपदेश दिला. ज्यांनी संतप्रमाण मानले ते परमशांतीला पोहोचले बाकीचे अशांतच ! पूर्वीपेक्षा आत्ताचा माणूस अत्यंत धावपळीचं आणि प्रचंड मानसिक तणावाचं जीवन जगत आहे. व्यक्ति श्रीमंत असो की गरीब सर्वांनाच दुर्बल मानसिकतेचा परिणाम भोगावा लागत आहे. असे असूनसुद्धा सर्वांना शांती मिळविण्यासाठी थोडासाही त्याग नको की कष्ट नको. असो.     नाशिकचे प.पु.श्री. नारायणकाका ढेकणे महाराज यांनी सर्वांच्या या समस्येवरही तोडगा काढला आहे. तो म्हणजे सिद्धयोग (महायोग) पूर्वाभ्यास पद्धती. यात कसलीही धावपळ नाही, कोठेही जायचे नाही, एक रुपयाचाही खर्च नाही, काहीही त्रास नाही, दु:ख नाही फक्त सुखच-सुख आणि प्रचंड मन:शांती.

     ही पूर्वाभ्यास पद्धती म्हणजे काय ?
1)    चटई अथवा घोंगडीचे आसन टाकून त्यावर स्वच्छ पांढरे कापड अंथरावे.
2)    बसताना ज्या पद्धतीने आपणास सुख वाटते अशा पद्धतीत म्हणजे साधी मांडी घालून बसावे.
3)    डोळे मिटावेत आणि शरीर जणू नाहीच अशा प्रकारे अत्यंत ढिले सोडावे.
4)    नंतर आपोआप आपल्या नाकाद्वारे आत-बाहेर जाणारा येणारा जो श्वास आहे त्याकडे फक्त पाहत बसावे.
(स्वत: मुद्दाम श्वास घेणे-सोडणे ह्या क्रिया करु नयेत. कारण आपण श्वास घेतला अथवा सोडला नाही तरीही तो आपोआप घेतला जातो व सोडला जातो. फक्त त्याकडे पाहत बसावे.
5)    या वेळी पाठीच्या कण्यातून वर मस्तकाकडे जाणाऱ्या सुक्ष्म प्राणलहरीचा अनुभव घ्यावा.
6)    हा एवढाच पूर्वाभ्यास असून स्वकल्याणासाठी रोज 15 मिनिटे करावा.

    आपला श्वासोश्र्वास यालाच ‘‘प्राणशक्ती’’, ‘‘चैतन्य’’ म्हणतात. ज्यावेळी आपण शरीर अत्यंत ढिले सोडून श्वासावर लक्ष ठेवतो त्यावेळी शरीराचा ताबा ही प्राणशक्ती घेते. त्यामुळे आपणास हा पूर्वाभ्यास करताना शरीराचा कंप होणे, शरीर डोलणे, डोळे उघडले न जाणे अशा प्रकारचे काहीही अनुभव आले तरी ते थांबविण्याचा-अडविण्याचा प्रयत्न करु नये. फक्त काय होते त्याकडे तटस्थपणे पहात रहावे. प्राणशक्ती आपल्या शरीर शुद्धीचे कार्य करीत असते. यावेळी ‘‘राम हमारा जप करें हम बैठे आराम’’ अशी उच्च स्थिती आपणास आपोआप लाभते. वरील विवेचनावरुन आपणास पूर्वाभ्यास म्हणजे काय ते लक्षात आले असेल. आता पूर्वाभ्यासाने नेमके काय घडते ते पाहू ....

(1)
    एका गावात एक सिद्ध सत्पुरुष आले. त्या गावातच एक परिस्थितीने गांजलेला मनुष्य राहत होता. त्या सत्पुरुषाची किर्ती ऐकून तो मनुष्य त्यांचेकडे गेला व म्हणाला ‘‘महाराज, मला एक असा राक्षस द्या जो माझा गुलाम बनून मी सांगीतलेेेले प्रत्येक काम चटकन करील.’’ सत्पुरुष कोणाचेही मन दुखवत नाहीत. त्यामुळे त्यांनी ठिक आहे म्हटले मात्र ‘‘या राक्षसास तुला एक क्षणभरही मोकळे ठेवता कामा नये. याला सतत काम दिले पाहिजे नाहीतर तो तुला खावून टाकेल.’’ असे सांगून ते तथास्तू म्हटल्याबरोबर तेथे एक महाकाय राक्षस उपस्थित झाला. मनुष्य खुश झाला. त्या मनुष्याने त्या राक्षसाकडून कामे करुन घ्यायला सुरुवात केली बघता बघता संपूर्ण नगरी सोन्याची बनली. त्या मनुष्याची एकही ईच्छा शिल्लक राहीली नाही. आता राक्षसास काम दिले नाहीतर तो आपणास खावून टाकेल या भीतीने तो मनुष्य त्या सत्पुरुषांकडे पुन्हा धावत गेला आणि म्हणाला ‘‘महाराज, मला क्षमा करा. माझी सगळी कामे झाली आहेत. आता माझ्याकडे काम नाही, तो राक्षस मला खावून टाकेल कृपा करुन त्यापासून माझे रक्षण करा.’’ त्यावर सत्परुषांनी त्यास एक उपाय सांगीतला. ते म्हणाले ‘‘तूझ्या दारात एक मोठा खांब उभा कर व त्याराक्षसास असा आदेश दे की, ज्यावेळी तुला काम नसेल त्यावेळी पुढचा आदेश मिळेपर्यंत या खांबावरुन खाली-वर येरझाऱ्या घालत बसायचे. यामुळे तो कामातच अडकेल आणि तुला तो खावून टाकणार नाही.’’ अशा प्रकारे उपाय करुन त्या मनुष्याच्या राक्षासाच्या भीतीतून सुटका झाली.

    वरील कथेवरुन आपण लक्षात घ्यावे की, आपले मनही या कथेतील राक्षसाप्रमाणेच आहे. तुम्ही पहा, आपण ज्यावेळी एखादे कामात मग्न असतो त्यावेळी मनही त्या कामातच स्थिर राहते आणि समजा आपण थोडे निवांत बसलो, मनाला काहीही काम मिळाले नाही की लगेच ते आपल्याला खायला उठते. कधी सुखाचे प्रसंग आठवेल, कधी दु:खाचे प्रसंग आठवून आपण दु:खी व्हाल तर कधी अपमानाचे प्रसंग आठवून क्रोधीत व्हाल, सुडभावनेनं आपण कधी पेटून उठू हे कळणारही नाही. म्हणजे आपलं मन जेव्हा रिकामं असतं तेव्हा ते आपल्या त्या राक्षसाप्रमाणेच खायलां उठतं. म्हणून तर संत महात्मे अखंड नामस्मरण करण्यास सांगतात. सततच्या नामस्मरणाने मन कायम कार्यमग्न राहते. कथेतल्या सत्पुरुषांनी जसा त्या मनुष्यास राक्षसापासून रक्षणाचा उपाय सांगीतला तसाच आपल्या या अतिचंचल मनाला शांतवण्याचा उत्तम उपाय म्हणजे ‘‘सिद्धयोग पूर्वाभ्यास.’’ राक्षसाला जसं खांबावरुन खाली-वर करायला सांगीतलं तसं ह्या मनाला आपण आपोआप खाली-वर होणाऱ्या श्वासावर लक्ष ठेवायला सांगायचं म्हणते तेही शांत झाल्याशिवाय राहणार नाही.

(2)
    ज्यावेळी आपण श्वासावर लक्ष ठेवतो (म्हणजे मनाला श्वासावर सोडून देतो) त्यावेळी ऐकणे, बघणे, वास घेणे, चव घेणे आणि विचार करणे ह्या क्रिया सहज थांबतात. म्हणजेच कान,डोळे,नाक,जीभ आणि महाबलशाली मन ह्या इंद्रियांना थांबवणे. आपण प्रामुख्याने याच इंद्रियांमार्फत विषय सेवन करतो, बाहेरच्या गोष्टी आत घेतो आणि आत्मशांती हरवून बसतो.
    नाकाला चांगलास वास हवा आहे, आपली निंदा कानावर पडता कामा नये, चांगलेच पहायला मिळावे, जीभेचे चोचले तर विचारवयासच नको आणि मन तर ... तुम्हाला ठावूकच आहे की मन काय आहे. तर केवळ श्वासावर लक्ष ठेवल्याने ह्या इंद्रियांचा संमय आपोआपच होतो. इंद्रिय संयमाच्या फायद्याचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे ... श्रीरामभक्त श्री हनुमान !
    हनुमान एवढे कर्तृत्ववान, बलशाली, बुद्धिमान आहेत म्हणून त्यांना ‘‘जितेंद्रीय’’ म्हणतात. जितेंद्रीय म्हणजे ज्याने सर्व इंद्रियांवर जय मिळविलेला आहे.
श्री हनुमंताचेच दुसरे नाव आहे ‘‘वायुसूत.’’ आणि वायू म्हणजेच प्राणशक्ती, चैतन्य.
        म्हणूनच श्वासावर लक्ष ठेवणे ही गोष्ट सोपी वाटत असली तरी त्याचे फल किती महान आहे हे आपणच पहावे.
श्रीमद् भगवद्गीतेत स्वत: भगवान म्हणतात...
उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत ।
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मन: ।। गिता 6-5।।

(स्वत:च स्वत:चा संसारसमुद्रातून उद्धार करुन घ्यावा आणि स्वत:ला अधोगतीला जावू देऊ नये. कारण मनुष्य हा स्वत:च स्वत:चा मित्र आहे आणि स्वत:च स्वत:चा शत्रूही आहे.)
पुढे ते म्हणतात...
बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जित: ।
अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत् ।। गिता 6-6।।

(ज्या जीवात्म्याने मन व इंद्रियांसह शरीर जिंकले, त्या जीवात्म्याचा तो स्वत:च मित्र आहे. आणि ज्याने मन व इंद्रियांसह शरीर जिंकले नाही, त्याचे तो स्वत:च शत्रुप्रमाणे शत्रुत्व करतो.)
म्हणून या पूर्वाभ्यासाचे प्रयोगाने आपण स्वत:च स्वत:चा मित्र बनू शकू व परमात्म्याच्या परमानंदात स्थिर राहू शकू. भगवंतच सर्वत्र प्राणशक्तीरुपाने विलसत आहेत. म्हणून ते आपणास आधारही देतात..
समोऽहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रिय: ।
ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम् ।। गीता 9-29।।

(मीच सर्व प्राणिमात्रात समभावाने व्यापून राहिलो आहे. मला ना कोणी अप्रिय ना प्रिय. परंतु जे भक्त मला प्रेमाने भजतात, ते माझ्यात राहतात आणि मीही त्यांच्यात प्रत्यक्ष प्रकट होतो.)

(3)
    आपला श्वास म्हणजे प्राण हा मनाचा बाप आहे. एक बापच आपल्या मुलास नियंत्रणात आणू शकतो. जसे एखादं लहान मुल घरात उधळ-आपट करीत असतं त्यावेळी आपले वडील पहात आहेत हे जर त्याच्या लक्षात आलं तर ते आपोआप नियंत्रणात येतं. तसं ह्या खोडकर मनाला प्राणरुपी बापाच्या धाकाने वठणीवर आणावयाचे आहे. प्राणाची सत्ता मनावर चालते. समजा मनच श्रेष्ठ आहे असे समजून, मनाचे ऐकून आपण नाक-तोंड दाबून धरु. काय होईल हो? अगदी थोड्याच वेळात प्राणशक्ती (आपला श्वास) आपला हात नाका-तोंडावरुन बाजूला घेण्यास भाग पाडेल. मग इथे मनापेक्षा प्राण श्रेष्ठ आहे हे सहज समजते.
    म्हणून ह्या मनरुपी चंचल मुलाच्या खोडकर कारवायातून वाचावयाचे असेल तर त्यावर प्राणरुपी बापाचीच धाक ठेवावी लागेल आणि ते करणं अगदी सोपं होईल ह्या ‘‘सिद्धयोग पूर्वाभ्यासाने.’’ म्हणून आपल्या मनाला श्वासावर सोडून द्यावे म्हणजे ते आपोआप नियंत्रीत होतं.

(4)
    आपणास माहिती आहे की प्राणायामाने शरीर निरोगी होतं. पण प्राणायाम करण्यासाठी सतत मार्गदर्शक व्यक्तिची आवश्यकता असते. पूर्वाभ्यासात ज्यावेळी आपण श्वासाकडे लक्ष ठेवतो त्यावेळी हळूहळू श्वास मंदावतो. (श्वासाचे वहन मंद होणं ही आयुष्य वाढविण्याची व क्रोधावर नियंत्रण मिळविण्याची गुरुकिल्ली आहे.  उदा. जर आपण रागावलो तर आपला श्वासोश्र्वास अतिशय वेगाने होत असतो पण 1-10 अंक मोजेपर्यन्त श्वास मंद होत जावून राग कुठच्या कुठे पळून जातो.) श्वास मंद होत जातो व कधी-कधी आतच जास्तवेळ थांबून राहतो हा झाला अंतरकुंभक. (अंतरकुंभक  झाला - केला नव्हे) याप्रमाणे कधी श्वास बाहेर पडतो व आत खेचला जात नाही हा झाला बहिरकुंभक (बहिरकुंभक झाला - केला नव्हे)अशा प्रकारे प्राणशक्तीकडून आपोआप प्राणायाम करुन घेतला जातो. प्राणशक्तीच आपला गुरु-मार्गदर्शक बनते. मग जिथे प्राणशक्तीच आपल्याकडून सर्वकाही करुन घेत आहे तर ते चुकीचे नि धोक्याचे कसे ठरेल ? ते तर आपल्या जीवनाच्या कृतार्थतेसाठीच आहे.     श्वासाकडे पाहण्याने मन अंतरंगात वळते आणि जे मन जगताशी संबंधीत असल्यामुळे दु:खी होते ते अंतरंगाकडे वळल्याने त्याच अक्षय सुखाची प्राप्ती झाल्यावाचून राहत नाही.

(5)
    पूर्वाभ्यासात ‘‘मी शरीर नसून चैतन्य आहे.’’ या भावनेने अनेकांना उच्च अनुभव आल्याचे सिद्ध झाले आहे. असे पहा, की जॉन नावाची एखादी व्यक्ती मरण पावली तर आपण म्हणतो - ‘‘जॉन गेला.’’ पण एखादा म्हणेल की, अहो जॉन कसा गेला?  हे इथे पडलेले शरीर जॉनचेच तर आहे ना !  त्यावर आपोआपच सिद्ध होते की, जॉनच्या शरीरातील प्राणतत्वास जॉन हे नाव होते. ते प्राणतत्व गेल्याने आपण ‘‘जॉन गेला.’’ असे म्हणतो कारण देह तर आज ना उद्या जाणार आहे पण जो आपल्या नित्य सोबत असणारा खरा
प्राणसखा ‘‘प्राणवायू’’ हेच आपले खरे स्वरुप आहे.
    वरील उदाहणावरुन प.पु.काकामहाराज म्हणतात की, जगातील प्रत्येक नांवे ही त्या प्राणशक्तीची, चैतन्य शक्तीची आहेत. कोणा देहाची नाहीत.
म्हणून नामसाधनेची उपासणा ही सुद्धा चैतन्याचीच उपासना आहे.

(6)
    हा सिद्धयोग पूर्वाभ्यास जगातील सर्व प्रकारच्या व्यक्ति जात-पात, स्त्री-पुरुष आदी कसलेही भेद न ठेवता करु शकतात. या पूर्वाभ्यासास कसल्याही प्रकारची बंधने नाहीत. पूर्वाभ्यास नुसता वाचून उपयोग नाही तर तो केल्याशिवाय त्याची प्रचिती येणार नाही. जसे पेढा किती गोड लागतो हे आपण प्रत्यक्ष खाल्ल्याशिवाय कळणार नाही. तसे आपणास आपल्या कल्याणाची तळमळ असेल तर हा पूर्वाभ्यास आपले कल्याण करण्यास समर्थ आहे. सर्वात प्रमुख मुद्दा म्हणजे हा पूर्वाभ्यास कुंडलिनी शक्ती जागरणासाठी अत्यंत उपयुक्त आहे. या पूर्वाभ्यासाने हळूहळू आपली सर्वश्रेष्ठ अशा शक्तिपात कुंडलिनी जागरणासाठी आपोआप तयारी होवून जीवनाच्या पूर्ण कल्याणाचा मार्ग प्रगतीपथावर राहील.

    आर्थिक अडचणी, मन एकाग्र न होणे, आत्मविश्र्वासाचा अभाव, सततचा ताण-तणाव, अति विचारांचे मनाला ग्रासणे, भय वाटणे, भोवतालचे दृष्ट वातावरण, व्यसनाधिनता आदी प्रकारचे विकार हा पूर्वाभ्यास रोज केल्याने हळूहळू आपोआप आटोक्यात येवून अंत:शुद्धी व मन:शांतीला प्रारंभ होईल.

    प.पु. नारायणकाका ढेकणेमहाराज म्हणतात हा मार्ग बिगर खर्चाचा, करण्यास अत्यंत सोपा व अति उच्च प्रकारचा आहे. ते म्हणतात, भारतातील प्रत्येक व्यक्तिचा जन्म पूर्वजन्मातील अपूर्ण राहिलेला योगाभ्यास पुर्ण करण्यासाठी झाला असून त्यासाठी हा पूर्वाभ्यास अत्यंत श्रेयस्कर  आहे.

हा पूर्वाभ्यास केल्यानंतर जे अनुभव येतील ते पुढील पत्त्यावर कळवावेत. 
आपणास पुढील मार्गदर्शन होईल.

प.प.श्री. लोकनाथतीर्थ स्वामी महाराज महायोग ट्रस्ट,
श्रीरंग नगर, पंपींग स्टेशन,गंगापूर रोड, नाशिक-5
।। शुभं भवतू ।।
प.पु. नारायणकाका ढेकणे महाराज, नाशिक यांचा
शक्तिपात कुंडलिनी शक्ति जागरणासाठीचा अमोघ पूर्वाभ्यास
    सध्याच्या गतीमान युगात मनुष्य धकाधकीच्या,पळापळीच्या जीवन जगण्याने अगदी मेटाकूटीला आला आहे. प्रचंड मानसिक ताण, विचारांचे थैमान, शारिरीक व्याधी आदी कारणाने तो थकून गेला आहे. स्वत:ची मानसिक शांती हरवून बसला आहे. या मानसिक शांतीच्या शोधात मग अध्यात्माकडे, योगाकडे वळू पाहतो आणि निराशाच पदरी घेतो. वास्तविक अध्यात्मात गुरुकृपा नसल्याने म्हणावी तशी प्रगती होत नाही, उपासनेला गती येत नाही आणि या जगात परमेश्र्वर आहे का नाही? अशा विचाराने तो हतबल होतो. योगामध्ये सतत गुरुंच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते. अल्पावधीत  आरोग्य प्राप्त व्हावे म्हणून मनुष्य आसनांचा तगाटाच लावून बसतो. परमसुख मिळावे, एखादी सिद्धी वगैरे प्राप्त व्हावी म्हणून नाक तोंड दाबून कुंभक करुन सिद्धी मिळविण्याच्या मागे लागतो आणि कायमस्वरुपी एखाद्या व्याधीच्या अधिन होवून राहतो.
    अशा मन:शांतीच्या शोधात असलेल्या आणि सर्व उपचार करुन थकलेल्यांसाठी नाशिकचे शक्तिपाताचार्य प.पु. नारायणकाका ढेकणे महाराज यांनी एका बिनखर्चाच्या शक्तिपात कुंडलिनीशक्ति जागरणाच्या पूर्वाभ्यास प्रयोगाचे आयोजन केले आहे. या पूर्वाभ्यासासाठी सतत गुरुंच्या मार्गदर्शनाची आवश्यकता नाही, किंवा गुरु संपर्कात असण्याचीही गरज नाही कि जात, धर्म, लिंग, वर्ण आदी कोणत्याही गोष्टींचे बंधन नाही. अगदी दुराचाऱ्यालाही याचा लाभ घेता येतो. मग बिनखर्चाच्या, अत्यंत सुलभ, परमशांती मिळवून देणाऱ्या आणि उच्च अध्यात्मिक स्थिती निर्माण करणाऱ्या या पूर्वाभ्यासाची आपण माहिती घेतली तरी व्यर्थ जाणार नाही.
    या विद्येची प्रमुख देवता आहे प्राण ! प्राण म्हणजेच चैतन्य. प्राण किंवा चैतन्य म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगावयाचे तर आपल्या नाकातून निरंतर आतबाहेर होत असणारा आपला श्वास ! यालाच चैतन्य म्हणतात आणि हे चैतन्य म्हणजेच सर्वव्यापी ईश्वर. म्हणून सर्वव्यापी प्राणशक्ती (चैतन्य) हेच माझे खरे स्वरुप आहे ही भावना जितकी दृढ, तेवढा या पूर्वाभ्यासात अधिकाधिक अनुभव येतो. आपल्या देहाचा स्वामी प्राण आहे जर प्राण या देहातून गेला तर ते शरीर नसून केवळ निर्जीव धड बनुन राहिल. शरीर कालांतराने नष्ट होणारे आहे म्हणून आपोआप होणारा श्वास (प्राण-चैतन्य) हेच आपले खरे स्वरुप आहे. 

    प्राणाचे मनावरही वर्चस्व आहे. एक छोटा प्रयोग करुन पहा - मनाचे वर्चस्व मोठे आहे समजून नाक तोंड दाबून बसा. काय होईल ? अगदी थोड्याच वेळात नाका-तोंडावरील हात आपोआप बाजूला घेतला जाईल. कारण प्राण मनाचे वर्चस्व नाकारुन हात बाजूला घेण्यास भाग पाडतो. 

    हा पूर्वाभ्यास एक प्रकारचा प्राणायामच आहे. मांडी घालून, शांतपणे, डोळे मिटून शरीर अत्यंत ढिले सोडून (जणू शरीरच नाही) आपोआप होणाऱ्या श्वासोश्वासावर लक्ष देणे. बस्स, एवढाच हा पूर्वाभ्यास !

    एवढ्या सोप्या क्रियेने आपणास काय अनुभव येतात ते आपले आपणच करुन पहावे. हा सांगण्याचा विषय नसून अनुभूतीचा विषय आहे. जेव्हा शरीर अत्यंत ढिले सोडून आपण आपोआप होणाऱ्या श्वासावर लक्ष देता त्यावेळी पाठीच्या कण्यातून खालून वर असा प्राणवायूचा प्रवाह चालल्याचा अनुभव येईल. त्याने सुखसंवेदनांचा लाभ होईल. अत्यंत आनंद वाटून मन प्रसन्न होईल. आपले आत्मिक बळ वाढेल. ज्यावेळी आपण प्राणावर मनाला सोडून देतो (म्हणजे आपोआप होणाऱ्या श्वासावर लक्ष देतो) त्यावेळी प्राणाची गती इतकी सुक्ष्म होते की, श्वास थांबल्यासारखा वाटतो. श्वास सुरु असतो परंतु आपले मन प्राणाबरोबर अंतर्मुख होते, शांत होते. स्थितप्रज्ञाप्रमाणे उच्च अध्यात्मिक स्थिती अनुभवयास मिळते. 

    सर्वात प्रमुख मुद्दा म्हणजे हा पूर्वाभ्यास कुंडलिनी शक्तीच्या जागरणासाठी अत्यंत उपयुक्त आहे. या पूर्वाभ्यासाने आपली हळूहळू सर्वश्रेष्ठ अशा कुंडलिनी शक्ती जागरणाच्या शक्तिपात दिक्षेसाठी आपोआप तयारी होईल आणि जीवनात परमशांती व परमेश्वर प्राप्तीचा मार्ग अगम्य रितीने मोकळा होईल.

    दररोज हा प्रयोग 3 ते 18 मिनिटे करावा. हा पूर्वाभ्यास करतेवेळी मनुष्य सुक्ष्म गोष्टींचा अनुभव घेत राहतो. त्यामुळे कधीकधी काही शारिरीक क्रिया आपोआप घडू लागतात. त्या साधकाने स्वत: हस्तक्षेप न करता घडू द्याव्यात. आपल्या कल्याणाकरीताच हे घडत असते. आर्थिक विवंचना, भोवतालचे दृष्ट वातावरण हळूहळू बदलू लागेल, व्यसनाधिनता, मानसिक क्लेष आदींतून मुक्ती तर होईलच होईल परंतु अत्यंत शांत, प्रसन्न सुखाची आपण अनुभूती घ्याल.

म्हणून हा पूर्वाभ्यास करुन आपण आपले अनुभव खालील पत्त्यावर कळवावेत.

प.प.लोकनाथतीर्थ स्वामी महाराज महायोग ट्रस्ट, श्रीरंग नगर, पंपींग स्टेशन,गंगापूर रोड, नाशिक-5
संकलक : मनोज भिंगारदिवे (शंकरनगर-अकलूज, संपर्क : 7798805535)