Wednesday, 25 January 2012

प.पु. नारायणकाका ढेकणे महाराज, नाशिक यांचा
शक्तिपात कुंडलिनी शक्ति जागरणासाठीचा अमोघ पूर्वाभ्यास
    सध्याच्या गतीमान युगात मनुष्य धकाधकीच्या,पळापळीच्या जीवन जगण्याने अगदी मेटाकूटीला आला आहे. प्रचंड मानसिक ताण, विचारांचे थैमान, शारिरीक व्याधी आदी कारणाने तो थकून गेला आहे. स्वत:ची मानसिक शांती हरवून बसला आहे. या मानसिक शांतीच्या शोधात मग अध्यात्माकडे, योगाकडे वळू पाहतो आणि निराशाच पदरी घेतो. वास्तविक अध्यात्मात गुरुकृपा नसल्याने म्हणावी तशी प्रगती होत नाही, उपासनेला गती येत नाही आणि या जगात परमेश्र्वर आहे का नाही? अशा विचाराने तो हतबल होतो. योगामध्ये सतत गुरुंच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते. अल्पावधीत  आरोग्य प्राप्त व्हावे म्हणून मनुष्य आसनांचा तगाटाच लावून बसतो. परमसुख मिळावे, एखादी सिद्धी वगैरे प्राप्त व्हावी म्हणून नाक तोंड दाबून कुंभक करुन सिद्धी मिळविण्याच्या मागे लागतो आणि कायमस्वरुपी एखाद्या व्याधीच्या अधिन होवून राहतो.
    अशा मन:शांतीच्या शोधात असलेल्या आणि सर्व उपचार करुन थकलेल्यांसाठी नाशिकचे शक्तिपाताचार्य प.पु. नारायणकाका ढेकणे महाराज यांनी एका बिनखर्चाच्या शक्तिपात कुंडलिनीशक्ति जागरणाच्या पूर्वाभ्यास प्रयोगाचे आयोजन केले आहे. या पूर्वाभ्यासासाठी सतत गुरुंच्या मार्गदर्शनाची आवश्यकता नाही, किंवा गुरु संपर्कात असण्याचीही गरज नाही कि जात, धर्म, लिंग, वर्ण आदी कोणत्याही गोष्टींचे बंधन नाही. अगदी दुराचाऱ्यालाही याचा लाभ घेता येतो. मग बिनखर्चाच्या, अत्यंत सुलभ, परमशांती मिळवून देणाऱ्या आणि उच्च अध्यात्मिक स्थिती निर्माण करणाऱ्या या पूर्वाभ्यासाची आपण माहिती घेतली तरी व्यर्थ जाणार नाही.
    या विद्येची प्रमुख देवता आहे प्राण ! प्राण म्हणजेच चैतन्य. प्राण किंवा चैतन्य म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगावयाचे तर आपल्या नाकातून निरंतर आतबाहेर होत असणारा आपला श्वास ! यालाच चैतन्य म्हणतात आणि हे चैतन्य म्हणजेच सर्वव्यापी ईश्वर. म्हणून सर्वव्यापी प्राणशक्ती (चैतन्य) हेच माझे खरे स्वरुप आहे ही भावना जितकी दृढ, तेवढा या पूर्वाभ्यासात अधिकाधिक अनुभव येतो. आपल्या देहाचा स्वामी प्राण आहे जर प्राण या देहातून गेला तर ते शरीर नसून केवळ निर्जीव धड बनुन राहिल. शरीर कालांतराने नष्ट होणारे आहे म्हणून आपोआप होणारा श्वास (प्राण-चैतन्य) हेच आपले खरे स्वरुप आहे. 

    प्राणाचे मनावरही वर्चस्व आहे. एक छोटा प्रयोग करुन पहा - मनाचे वर्चस्व मोठे आहे समजून नाक तोंड दाबून बसा. काय होईल ? अगदी थोड्याच वेळात नाका-तोंडावरील हात आपोआप बाजूला घेतला जाईल. कारण प्राण मनाचे वर्चस्व नाकारुन हात बाजूला घेण्यास भाग पाडतो. 

    हा पूर्वाभ्यास एक प्रकारचा प्राणायामच आहे. मांडी घालून, शांतपणे, डोळे मिटून शरीर अत्यंत ढिले सोडून (जणू शरीरच नाही) आपोआप होणाऱ्या श्वासोश्वासावर लक्ष देणे. बस्स, एवढाच हा पूर्वाभ्यास !

    एवढ्या सोप्या क्रियेने आपणास काय अनुभव येतात ते आपले आपणच करुन पहावे. हा सांगण्याचा विषय नसून अनुभूतीचा विषय आहे. जेव्हा शरीर अत्यंत ढिले सोडून आपण आपोआप होणाऱ्या श्वासावर लक्ष देता त्यावेळी पाठीच्या कण्यातून खालून वर असा प्राणवायूचा प्रवाह चालल्याचा अनुभव येईल. त्याने सुखसंवेदनांचा लाभ होईल. अत्यंत आनंद वाटून मन प्रसन्न होईल. आपले आत्मिक बळ वाढेल. ज्यावेळी आपण प्राणावर मनाला सोडून देतो (म्हणजे आपोआप होणाऱ्या श्वासावर लक्ष देतो) त्यावेळी प्राणाची गती इतकी सुक्ष्म होते की, श्वास थांबल्यासारखा वाटतो. श्वास सुरु असतो परंतु आपले मन प्राणाबरोबर अंतर्मुख होते, शांत होते. स्थितप्रज्ञाप्रमाणे उच्च अध्यात्मिक स्थिती अनुभवयास मिळते. 

    सर्वात प्रमुख मुद्दा म्हणजे हा पूर्वाभ्यास कुंडलिनी शक्तीच्या जागरणासाठी अत्यंत उपयुक्त आहे. या पूर्वाभ्यासाने आपली हळूहळू सर्वश्रेष्ठ अशा कुंडलिनी शक्ती जागरणाच्या शक्तिपात दिक्षेसाठी आपोआप तयारी होईल आणि जीवनात परमशांती व परमेश्वर प्राप्तीचा मार्ग अगम्य रितीने मोकळा होईल.

    दररोज हा प्रयोग 3 ते 18 मिनिटे करावा. हा पूर्वाभ्यास करतेवेळी मनुष्य सुक्ष्म गोष्टींचा अनुभव घेत राहतो. त्यामुळे कधीकधी काही शारिरीक क्रिया आपोआप घडू लागतात. त्या साधकाने स्वत: हस्तक्षेप न करता घडू द्याव्यात. आपल्या कल्याणाकरीताच हे घडत असते. आर्थिक विवंचना, भोवतालचे दृष्ट वातावरण हळूहळू बदलू लागेल, व्यसनाधिनता, मानसिक क्लेष आदींतून मुक्ती तर होईलच होईल परंतु अत्यंत शांत, प्रसन्न सुखाची आपण अनुभूती घ्याल.

म्हणून हा पूर्वाभ्यास करुन आपण आपले अनुभव खालील पत्त्यावर कळवावेत.

प.प.लोकनाथतीर्थ स्वामी महाराज महायोग ट्रस्ट, श्रीरंग नगर, पंपींग स्टेशन,गंगापूर रोड, नाशिक-5
संकलक : मनोज भिंगारदिवे (शंकरनगर-अकलूज, संपर्क : 7798805535)

No comments: